पालघर : पालघर जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील पाऊल उचलत ‘सुपोषण साथी पालघर’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समितीतील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मिळून ६५ अतितीव्र कुपोषित (SAM) आणि ७३४ मध्यम तीव्र कुपोषित (MAM) अशा एकूण ७९९ बालकांना दत्तक घेणार आहेत. या बालकांच्या आरोग्याची नियमित देखरेख, पूरक पोषण आहाराची व्यवस्था आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांकडे असणार आहे. नवव्या राष्ट्रीय पोषण महिन्याच्या निमित्ताने जिल्हा परिषद, पालघर येथे जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. १५ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या या मोहिमेचा पहिला टप्पा १५ मार्च २०२७ पर्यंत राबविण्यात येणार आहे. या कालावधीत प्रथम ६५ अतितीव्र कुपोषित बालकांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल, तर पुढील टप्प्यात ७३४ मध्यम तीव्र कुपोषित बालकांना तालुका व ग्रामस्तरीय अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत दत्तक घेण्यात येणार आहे. प्रत्येक बालकासाठी स्वतंत्र आरोग्य कार्ड तयार करून त्याचे वजन, उंची, वाढ, लसीकरण, आरोग्य तपासणी, पोषण स्थिती आणि आवश्यक औषधोपचार यांचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. संबंधित अधिकारी दर महिन्याला किमान एकदा बालकाच्या घरी किंवा अंगणवाडीत भेट देऊन त्याच्या आरोग्याची प्रत्यक्ष पाहणी करतील. यासोबतच शासनाच्या विविध योजनांचा लाभ कुटुंबांपर्यंत पोहोचवून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश केवळ बालकांना पोषक आहार देणे इतकाच मर्यादित नसून त्यांच्या कुटुंबाचे सर्वांगीण सक्षमीकरण करणे हाही आहे. अधिकारी गृहभेटीदरम्यान कुटुंबाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती समजून घेतील आणि स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, योग्य बालसंगोपन, संतुलित आहार, दूध, अंडी, मोड आलेली कडधान्ये, धान्य तसेच इतर प्रथिनयुक्त अन्नपदार्थ उपलब्ध राहतील याची काळजी घेतील. आवश्यकतेनुसार बालकांना बाल विकास केंद्र (VCDC) किंवा पोषण पुनर्वसन केंद्र (NRC) येथे दाखल करून विशेष उपचार व अतिरिक्त पोषण दिले जाणार आहे. कुटुंबातील व्यसनाधीनता, अंधश्रद्धा यांसारख्या समस्यांवर समुपदेशनही केले जाईल. याशिवाय अंगणवाडी केंद्रांतील सुविधा, पूरक पोषण आहार आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेत सुधारणा करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. या उपक्रमात जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, अंगणवाडी यंत्रणा, आशा सेविका आणि ग्रामस्तरीय अधिकारी यांचा समन्वय साधून प्रत्येक बालकाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेतला जाईल. कार्यक्रमावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, इजाज अहमद शरीकमसलत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंके, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. वैदही माळवी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी सर्व अधिकाऱ्यांना संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन केले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी ‘कुपोषणमुक्त पालघर’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्रशासन, अधिकारी, अंगणवाडी कर्मचारी आणि समाज यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणारा हा उपक्रम पालघर जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






