नवी दिल्ली : कोरोना महामारीनंतर काही प्रमाणात दिलासा मिळालेला असताना आता दिल्ली-एनसीआरमध्ये स्वाईन फ्लूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. राजधानी दिल्लीत स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या २,३०८ वर पोहोचली असून इन्फ्लूएंझा ए आणि बी या दोन्ही प्रकारच्या रुग्णांची एकूण संख्या ३,००० च्या पुढे गेली आहे. विशेष म्हणजे गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवसात १०५ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. पंकज कुमार सिंह यांनी आंतरविभागीय आढावा बैठकीनंतर सांगितले की, सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून औषधसाठा, तपासणी सुविधा आणि उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यावर्षी H1N1 हा स्वाईन फ्लूचा प्रमुख विषाणू प्रकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तर गेल्या वर्षी H3N2 प्रकार अधिक आढळला होता. स्वाईन फ्लूबरोबरच डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली असून आतापर्यंत डेंग्यूचे ५७० आणि मलेरियाचे २१५ रुग्ण नोंदवले गेले आहेत. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे यावर्षी या दोन्ही आजारांमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने राज्याला सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली. त्यांनी तयारी केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष रुग्णांना वेळेत उपचार मिळतील, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. अवघ्या २४ तासांत रुग्णसंख्या १५ वरून १२० वर पोहोचल्याने प्रशासनाने तातडीने कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. संसर्गाचा वेग लक्षात घेता नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वाईन फ्लूचा विषाणू प्रामुख्याने बाधित व्यक्ती खोकताना, शिंकताना किंवा बोलताना हवेत पसरणाऱ्या सूक्ष्म थेंबांद्वारे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. हे थेंब श्वासावाटे शरीरात गेल्यास संसर्ग होण्याची शक्यता वाढते. तसेच बाधित व्यक्तीने नाक किंवा तोंडाला हात लावल्यानंतर दरवाज्याचे हँडल, रेलिंग किंवा इतर वस्तूंना स्पर्श केल्यास त्या वस्तू दूषित होतात. त्यानंतर अशा पृष्ठभागांना स्पर्श केलेल्या व्यक्तीने हात डोळे, नाक किंवा तोंडाला लावल्यास विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो. त्यामुळे वारंवार हात स्वच्छ धुणे, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे, ताप, खोकला, घसा खवखवणे किंवा श्वसनासंबंधी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आणि स्वतःहून औषधे न घेणे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. सध्या रुग्णालयांना आवश्यक औषधे आणि चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगल्यास आजाराचा प्रसार रोखण्यास मोठी मदत होऊ शकते, असे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे.






