मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दक्षिण मुंबईतील आंदोलनांसाठी नवे नियम लागू केले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत राजपत्राद्वारे हे निर्बंध लागू करण्यात आले असून, दक्षिण मुंबईत मोर्चे, धरणे, जाहीर सभा आणि निदर्शनांसाठी आता केवळ आझाद मैदान हेच अधिकृत ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. यापुढे अन्य कोणत्याही ठिकाणी आंदोलन किंवा मोर्चाला परवानगी दिली जाणार नाही. आंदोलनासाठी किमान सात दिवस आधी संबंधित पोलीस प्रशासनाकडे अर्ज करणे बंधनकारक असून, एका वेळी केवळ एका दिवसासाठीच परवानगी दिली जाईल. आंदोलन फक्त शासकीय कामकाजाच्या दिवशीच करता येणार असून, सुट्टीच्या दिवशी परवानगी मिळणार नाही. तसेच विधिमंडळ अधिवेशन, व्हीआयपी किंवा व्हीव्हीआयपी दौरे, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन तसेच अन्य सुरक्षा कारणांमुळे पोलिसांना परवानगी नाकारण्याचा अधिकार देण्यात आला आहे. आंदोलनाची वेळही निश्चित करण्यात आली असून, सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीतच आंदोलन करता येणार आहे. सायंकाळी सहानंतर आझाद मैदान पूर्णपणे रिकामे करणे बंधनकारक असेल. एका आंदोलनासाठी जास्तीत जास्त ५ हजार आंदोलकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल. सरकारच्या म्हणण्यानुसार, सर्वसामान्य नागरिकांना आणि वाहतुकीला कमीत कमी अडथळा निर्माण व्हावा तसेच आंदोलने अधिक शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावीत, या उद्देशाने हे नियम लागू करण्यात आले आहेत.
नव्या नियमांनुसार आंदोलनस्थळी बैलगाड्या, ट्रॅक्टर, ट्रॉली, जड वाहने, सायकल-रिक्षा, हातगाड्या तसेच प्राणी आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. गतवर्षी आंदोलनादरम्यान निर्माण झालेली वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय आझाद मैदानाकडे येणारे किंवा तेथून निघणारे मोर्चे काढण्यासही मनाई करण्यात आली आहे. ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी स्वतंत्र परवानगी आवश्यक असेल, तर आंदोलनातील झेंडे आणि बॅनरचा आकार ९ फूट बाय ६ फुटांपेक्षा मोठा नसावा. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काठ्या दोन फुटांपेक्षा अधिक लांबीच्या असू नयेत. आंदोलकांना लाठ्या, तलवारी, बंदुका, भाले किंवा अन्य शस्त्रे बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, भडकाऊ भाषणे किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच आक्षेपार्ह चित्रफीत किंवा ध्वनिफीत तयार करून ती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यासही बंदी असेल. आत्मदहनाचा प्रयत्न, आत्महत्या, आमरण उपोषण, पुतळे, कागदपत्रे किंवा पुस्तके जाळणे तसेच आंदोलनस्थळी अन्न शिजवण्यावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई आयोजकांकडून वसूल करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
आझाद मैदान आंदोलनाचे नवीन नियम (थोडक्यात):
- दक्षिण मुंबईत आंदोलनासाठी फक्त आझाद मैदान निश्चित.
- किमान ७ दिवस आधी पोलिसांची परवानगी अनिवार्य.
- एका वेळी फक्त एकच दिवसाची परवानगी.
- सायंकाळी ६ वाजता मैदान रिकामे करणे बंधनकारक.
- ट्रॅक्टर, जड वाहने, बैलगाड्या आणि प्राण्यांना मैदानात नो एंट्री.
या नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कायदेशीर कारवाई होईल.






