मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईत घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनावर मोठा परिणाम झाला असून, अनेक भागांमध्ये कचरा उचलण्याचे काम ठप्प झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. खासगीकरण आणि कंत्राटी पद्धतीला विरोध करत कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्यामुळे मुंबईतील विविध विभागांमध्ये महापालिकेच्या कचरा संकलन वाहनांची चाके थांबली आहेत. यामुळे रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये आणि अनेक गृहनिर्माण सोसायट्यांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग साचण्यास सुरुवात झाली असून, हा संप दीर्घकाळ सुरू राहिल्यास शहरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात दररोज हजारो टन कचरा निर्माण होत असल्याने कचरा संकलनाची साखळी काही तास खंडित झाली तरी त्याचा मोठा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होतो. त्यामुळे घराबाहेर पडताना दुर्गंधीचा सामना करावा लागणार का, असा प्रश्न आता अनेक मुंबईकरांना पडू लागला आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, के/नॉर्थ, जी/नॉर्थ आणि के/साऊथ या महत्त्वाच्या विभागांमध्ये एमएल कामगार आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत कार्यरत कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के कामबंद आंदोलनात सहभाग घेतला आहे. परिणामी या विभागांतील कचरा वाहतूक जवळपास पूर्णपणे ठप्प झाली आहे. एफ/नॉर्थ विभागातही अशीच परिस्थिती असून ई वॉर्डमध्ये तीनपैकी दोन कचरा संकलन चौक्यांतील वाहने जागीच उभी आहेत. अनेक ठिकाणी दिवसभर महापालिकेची एकही कचरा गाडी न फिरल्याने कचऱ्याचे ढीग वाढू लागले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने तातडीने हालचाली सुरू केल्या असून झोन २ आणि झोन ३ मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पर्यायी व्यवस्था उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या विभागांमध्ये कर्मचारी उपलब्ध आहेत, तेथील मनुष्यबळ आणि वाहनांचे पूलिंग करून आवश्यक त्या भागात कचरा संकलन सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत कचरा उचलण्याचे काम पूर्णपणे बंद पडू नये, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र, कामगारांचे आंदोलन आणि प्रशासन यांच्यात लवकर तोडगा न निघाल्यास शहरातील स्वच्छतेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले असून, येत्या काही तासांत किंवा दिवसांत परिस्थिती कशी बदलते, यावर शहरातील कचरा व्यवस्थापनाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.





