मुंबई : रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयानंतर मुंबईतील वातावरण अधिकच तापले असून, या निर्णयाच्या अंमलबजावणीदरम्यान कांदिवली आणि चारकोप परिसरात मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) १५ ऑगस्टपासून रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मराठी ज्ञानाची चाचणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर कांदिवली पश्चिमेकडील हिंदुस्तान नाका परिसरात एका मराठी रिक्षाचालकाला काही अमराठी रिक्षाचालकांनी अडवून मारहाण केल्याचा आरोप समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चालक प्रवासी घेऊन हिंदुस्तान नाक्यावरून रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असताना क्रोमा शोरूमसमोर काही अमराठी रिक्षाचालकांनी त्यांची रिक्षा अडवली. त्यांनी रिक्षा बंद ठेवण्यास सांगितले आणि त्यास विरोध केल्यानंतर धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, त्याच्या रिक्षेचा वायपरही तोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पीडित चालकाने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे रिक्षाचालकांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. एका बाजूला मराठी भाषा शिकणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात असताना, दुसऱ्या बाजूला काही अमराठी चालकांकडून या निर्णयाला विरोध होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हा वाद केवळ भाषेपुरता मर्यादित न राहता सामाजिक आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरत आहे.
दरम्यान, या घटनेची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) घेत आक्रमक भूमिका घेतली आहे. कांदिवलीतील चारकोप विधानसभा मतदारसंघातील विविध चौकांमध्ये मनसेकडून मोठे बॅनर लावण्यात आले असून, त्याद्वारे अमराठी रिक्षाचालकांना थेट इशारा देण्यात आला आहे. “जर तुम्हाला मराठी भाषा शिकण्यात आणि बोलण्यात कमीपणा वाटत असेल, तर आपल्या राज्यात परत निघून जा,” असा स्पष्ट संदेश या बॅनरवर देण्यात आला आहे. तसेच संप, आंदोलन किंवा रस्ते रोखून मुंबईकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्यास मनसे गप्प बसणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. मराठी भाषेचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून राजकीय वातावरणही तापले असून, विविध पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. एका बाजूला मराठी भाषेचा सन्मान राखण्याची भूमिका मांडली जात असताना, दुसरीकडे कायदा हातात घेऊन कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा दडपशाही होऊ नये, अशी मागणीही होत आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, दोषींवर कायदेशीर कारवाई होणार का, तसेच मराठी भाषा सक्तीच्या नियमाची अंमलबजावणी पुढे कशा पद्धतीने केली जाणार, याकडे रिक्षाचालकांसह सर्व मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.






