पालघर : पालघर जिल्ह्यातील जव्हार परिसरातील प्रसिद्ध दाभोसा धबधब्याजवळ उभारण्यात आलेला काचेचा पूल अखेर १५ ऑगस्टपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला असून, उद्घाटनानंतर अवघ्या दोन दिवसांतच या नव्या पर्यटनस्थळाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर धबधब्याचे विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळली. रविवार आणि सोमवारी मिळून तब्बल १६७५ पर्यटकांनी काचेच्या पुलावरून दाभोसा धबधब्याचे निसर्गरम्य दर्शन घेतले. दाभोसा धबधबा हा पावसाळ्यातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक मानला जातो. या ठिकाणी पर्यटकांना अधिक रोमांचक अनुभव देण्यासाठी उंचावर काचेचा स्कायवॉक उभारण्यात आला आहे. पुलाचे बांधकाम जून महिन्यात पूर्ण झाले होते, मात्र सुरक्षेची तपासणी, व्यवस्थापनाची जबाबदारी खाजगी संस्थेकडे सोपवणे, प्रवेश नियंत्रण, सुरक्षा यंत्रणा आणि गर्दी व्यवस्थापन यांसारख्या बाबी पूर्ण न झाल्याने उद्घाटन काही काळ लांबले होते. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीपासून अनेक पर्यटकांना प्रवेशबंदीमुळे निराश होऊन परतावे लागत होते. प्रशासनाने सर्व तांत्रिक आणि सुरक्षाविषयक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अखेर हा पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. उद्घाटनानंतर सोशल मीडियावर या पुलाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळेही पर्यटकांचा ओघ वाढत असल्याचे दिसून येत आहे. उंचावर उभे राहून काचेच्या फरशीमधून खाली कोसळणारा धबधबा पाहण्याचा थरार अनुभवण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून पर्यटक जव्हारकडे आकर्षित होत आहेत.
पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून, कोणतीही जोखीम टाळण्यासाठी अनेक नियम लागू केले आहेत. काचेच्या पुलावर प्रवेशासाठी प्रति व्यक्ती ५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले असून, दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेतच पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. पुलावरील भार नियंत्रित ठेवण्यासाठी एकावेळी केवळ सात ते दहा पर्यटकांनाच प्रवेश दिला जात आहे. तसेच सहा वर्षांखालील मुलांना सुरक्षेच्या कारणास्तव पुलावर जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. प्रशासनाने स्कायवॉकची क्षमता लक्षात घेऊन प्रवेश व्यवस्थेवर विशेष भर दिला आहे. पुलावर आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, ही यंत्रणा स्थानिक पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडली जाणार आहे. प्रवेशद्वारावर अतिरिक्त नियंत्रण व्यवस्था, गर्दी नियोजन, सुरक्षा कर्मचारी आणि सतत देखरेख ठेवण्याची तयारीही करण्यात आली आहे. वाढत्या पर्यटक संख्येमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. दाभोसा काचेचा पूल सुरू झाल्यामुळे जव्हार परिसरातील पर्यटनाला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, स्थानिक व्यवसाय, हॉटेल्स आणि पर्यटनाशी संबंधित रोजगारालाही याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने पर्यटकांना नियमांचे पालन करून सुरक्षितपणे या आकर्षणाचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.






