रायगड : आषाढी अमावस्येनिमित्त साजऱ्या होणाऱ्या गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर मटण, चिकन आणि मासळीच्या बाजारात मोठी लगबग सुरू झाली आहे. श्रावण महिन्यापूर्वी मांसाहाराचा आस्वाद घेण्याची परंपरा असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारात मोठी गर्दी अपेक्षित आहे. मात्र, यंदा मटणाच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे खवय्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. सध्या मटण मिक्सचा दर सुमारे ९०० रुपये प्रतिकिलो, तर पिव्वर मटणाचा दर १,००० रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे. त्यामुळे गटारीसाठी मटणाचा बेत करणाऱ्यांना यंदा अधिक खर्च करावा लागणार आहे. आषाढी अमावस्या संपल्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होत असल्याने अनेक जण या काळात मांसाहार टाळतात किंवा त्याचे प्रमाण कमी करतात. त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वी गटारी अमावस्येला मटण, चिकन आणि मासळीचा बेत करण्याला विशेष महत्त्व असते. याच कारणामुळे या दिवशी मांसाहारी पदार्थांना मोठी मागणी असते. गेल्या काही दिवसांत मटणाच्या दरात सातत्याने वाढ झाली असून, वाढलेल्या किमतीमुळे काही ग्राहकांनी मटणाचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अनेकांनी दरवाढीकडे दुर्लक्ष करून गटारीचा पारंपरिक बेत कायम ठेवण्याची तयारी केली आहे.
दरवाढ असूनही गटारीच्या दिवशी मटणाच्या मागणीत कोणतीही घट होण्याची शक्यता नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. शहरांसह ग्रामीण भागातील मटण विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात बोकडांची आवक केली असून, रायगड जिल्ह्यात गटारीच्या दिवशी हजारो बोकडांची विक्री होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मटण महागल्यामुळे काही ग्राहक तुलनेने स्वस्त पर्याय म्हणून चिकनकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिकनच्या दुकानांमध्येही मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी अपेक्षित असून, विक्रेत्यांनी त्यासाठी आवश्यक तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, गटारीच्या निमित्ताने मासळी बाजारातही उत्साहाचे वातावरण आहे. समुद्रातील ताजी मासळी, तसेच नदी आणि खाडीतील विविध प्रकारच्या मासळीला मोठी मागणी राहण्याची शक्यता असून, मासळी बाजारही ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. एकूणच, मटणाचे दर हजार रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले असले तरी गटारी अमावस्येचा उत्साह कमी झालेला दिसत नाही. वाढत्या किमतींचा फटका ग्राहकांना बसत असला, तरी पारंपरिक गटारीचा बेत कायम ठेवण्यासाठी अनेक खवय्ये अतिरिक्त खर्च करण्यासही तयार असल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे. “दर वाढले तरी गटारीचा बेत कायम,” अशीच भावना ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये दिसून येत आहे.





