वृत्तसंस्था : झारखंड लोकसेवा आयोगाच्या (JPSC) भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी १० ऑगस्ट रोजी झारखंड विधानसभेला घेराव घालण्यासाठी मोर्चा काढला. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी विधानसभेकडे जाणाऱ्या विविध मार्गांवर मोठा बंदोबस्त ठेवत एकूण ६ ठिकाणी बॅरिकेड्स उभारले होते. मात्र, आंदोलक विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण पद्धतीने पुढे जात ३ बॅरिकेड्स तोडून विधानसभेकडे कूच केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे मारून आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे (JLKM) नेते देवेंद्रनाथ महतो हे धुर्वा गोलचक्कर येथे ॲम्बुलन्सने पोहोचल्यानंतर त्याच वाहनातून विधानसभेकडे रवाना झाले. ते इतर आंदोलक विद्यार्थ्यांसह मोर्चात सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी आपण शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत असल्याचा दावा केला असून, भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय मिळावा, हीच आपल्या आंदोलनामागील भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, JPSC परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ‘इन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट’ (ECIR) नोंदवला असून, या प्रकरणाच्या तपासाला आता अधिक गती मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
रांचीतील जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर गेल्या १७ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच २०१९ नंतर झालेल्या JSSC CGL, JSSC JE आणि PGT परीक्षा रद्द कराव्यात, भरती प्रक्रियेत सुधारणा करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, वर्गनिहाय कटऑफ जाहीर करावा, ओएमआर प्रत आणि रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून द्यावी तसेच यूपीएससी आणि एसएससीच्या धर्तीवर नियमित भरती कॅलेंडर जाहीर करावे, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत. झारखंड सरकारने विद्यार्थ्यांच्या सुमारे ९८ टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा केला असला, तरी विद्यार्थ्यांनी तो फेटाळून लावत परीक्षा रद्द करणे आणि कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी यांसारख्या प्रमुख मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याचा आरोप केला आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे देवेंद्रनाथ महतो यांनी उपोषणाचा आज नववा दिवस असल्याचे सांगत आपली प्रकृती खालावत असली तरी पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याची वेदना अधिक मोठी असल्याचे नमूद केले. “आज क्रांतीचा दिवस असून, अनेक महिन्यांच्या संघर्षाचा हा निर्णायक टप्पा आहे,” असे सांगत त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.






