रायगड : रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील चावणे येथील एचपीसीएल पाताळगंगा एलपीजी बॉटलिंग प्लांटमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे प्लांट परिसरात साठवून ठेवण्यात आलेले अंदाजे ३ हजार एलपीजी गॅस सिलेंडर, ज्यामध्ये भरलेले तसेच रिकामे सिलेंडरही आहेत, पुराच्या पाण्याबरोबर पाताळगंगा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. चावणे येथील अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील एचपीसीएलच्या प्लॉट क्रमांक ई-१/७ मधून हे सिलेंडर नदीत वाहून गेल्यामुळे पाताळगंगा नदीकाठच्या विविध गावांमध्ये ते वाहत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन करत कोणत्याही परिस्थितीत नदीत किंवा नदीकाठावर आढळणाऱ्या सिलेंडरना हात लावू नये, ते उचलू नयेत किंवा घरी नेण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्ट केले आहे. नदीत वाहून आलेल्या सिलेंडरमध्ये गॅस शिल्लक आहे की नाही किंवा ते सुरक्षित स्थितीत आहेत का, याची खात्री नसल्यामुळे अशा सिलेंडरना हाताळणे अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे नागरिकांनी उत्सुकतेपोटी कोणतीही जोखीम न घेता स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना असेही आवाहन केले आहे की, नदीकाठावर किंवा परिसरात एखादा एलपीजी सिलेंडर आढळल्यास तो स्वतःजवळ न ठेवता तात्काळ एचपीसीएल कंपनी, जवळच्या एचपीसीएल वितरकाकडे, तहसीलदार कार्यालय खालापूर, तहसीलदार कार्यालय पेण किंवा उपविभागीय अधिकारी, पेण यांच्या कार्यालयात जमा करावा. तसेच सिलेंडर आढळल्याची माहिती त्वरित महसूल विभाग, पोलीस किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला द्यावी. मुसळधार पावसामुळे नदीपात्रात विविध वस्तू वाहून येत असल्याने संशयास्पद वस्तूंना हात न लावण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यातून रायगड जिल्ह्यातील पूरसदृश्य परिस्थितीची तीव्रता स्पष्ट होत आहे. दरम्यान, प्रशासनाने संबंधित यंत्रणांच्या मदतीने नदीत वाहून गेलेल्या सिलेंडरचा शोध घेण्याचे आणि ते सुरक्षितरीत्या परत मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आवाहन केले आहे.






