पुणे : आषाढी वारी ही भक्ती, सेवा आणि समर्पणाचा अनोखा संगम मानली जाते. आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करत लाखो वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात सहभागी होतात. या प्रवासात वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक सामाजिक आणि स्वयंसेवी उपक्रम राबविले जातात. आधुनिक काळात मोबाईल हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला असून वारीदरम्यान कुटुंबीयांशी संपर्कात राहण्यासाठी त्याची आवश्यकता अधिक जाणवते. ही गरज लक्षात घेऊन काही दिंड्यांकडून वारकऱ्यांसाठी मोफत मोबाईल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील सुधाकर महाराज पवळे गेल्या १५ वर्षांपासून वारी करत असून, वारकऱ्यांना मोबाईल चार्जिंगसाठी होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी आपल्या दिंडीत ही सेवा सुरू केली. अनेक ठिकाणी मोबाईल चार्ज करण्यासाठी पैसे आकारले जात असल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी स्वतःच्या पुढाकारातून ही सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमामुळे वारकऱ्यांना कोणताही आर्थिक भार न पडता मोबाईल चार्ज करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
या व्यवस्थेमध्ये एकाच वेळी ६० हून अधिक मोबाईल चार्ज करता येतात. आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण वारीदरम्यान ही सुविधा अखंडपणे सुरू ठेवली जाते. मोबाईल सुरक्षितपणे चार्ज होतील यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक त्याचे नियोजन आणि देखरेख करतात. त्यामुळे वारकऱ्यांना चार्जिंगसाठी वेगळी धावपळ करावी लागत नाही. मोबाईल चार्ज असल्यामुळे ते आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधू शकतात, गावातील घडामोडी जाणून घेऊ शकतात तसेच आवश्यक प्रसंगी तात्काळ संवाद साधणे शक्य होते. खासगी ठिकाणी मोबाईल चार्ज करण्यासाठी साधारणपणे एका मोबाईलमागे २० रुपये आकारले जात असताना, दिंडीत उपलब्ध असलेल्या या मोफत सुविधेमुळे वारकऱ्यांचा खर्चही वाचत आहे. सेवाभावातून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम वारीच्या परंपरेतील माणुसकी, सहकार्य आणि निस्वार्थ सेवेचे उत्तम उदाहरण ठरत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा समाजोपयोगी वापर कसा करता येतो, याचाही आदर्श निर्माण करत आहे.






