मुंबई : मुंबईतील अंधेरी सब वे दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. ही समस्या कायमची सोडवण्यासाठी मुंबई महापालिका विविध पर्यायांचा विचार करत असून, त्यामध्ये सब वेखाली भूमिगत पाणी साठवण टाकी उभारण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव समोर आला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भात माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सब वेमध्ये पाणी साचू लागताच ते थेट भूमिगत टाकीत वळवले जाईल आणि नंतर पंपांच्या साहाय्याने टप्प्याटप्प्याने बाहेर सोडले जाईल. नुकत्याच झालेल्या मान्सूनपूर्व पावसानंतर अंधेरी सब वे पुन्हा पाण्याखाली गेल्याने या प्रश्नावर चर्चा झाली. स्थायी समिती सदस्य आणि भाजप नगरसेविका प्रिती सातम तसेच शिवसेना (उबाठा) पक्षाचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी सब वेतील पाणी तुंबण्याच्या समस्येबाबत आणि मोगरा नाला पंपिंग स्टेशनच्या कामाच्या प्रगतीबाबत प्रश्न उपस्थित केले.
यावर उत्तर देताना अभिजीत बांगर यांनी सांगितले की, अंधेरी सब वे तीन ते चार महिन्यांच्या पावसाळी कालावधीत तब्बल २५ ते ३० वेळा पाण्याखाली जातो. परिसरातील चार नाले, मोठ्या प्रमाणातील पाण्याचा प्रवाह आणि ५५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास येथे गंभीर पाणी साचते. या समस्येवर उपाय म्हणून तीन वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साठवण टाक्या उभारण्याचा विचार सुरू असून, त्यांची एकत्रित क्षमता सुमारे ४१ हजार घनमीटर असेल. मात्र ५५ मिमी पावसातच सब वेमध्ये सव्वा ते दीड लाख घनमीटर पाणी साचत असल्याने या टाक्या अपुऱ्या पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे थेट सब वेखाली मोठी भूमिगत टाकी उभारण्याचा पर्याय तपासला जात आहे. या योजनेमुळे पाणी रस्त्यावर साचण्याऐवजी टाकीत जमा होईल आणि सब वे वाहतुकीसाठी खुला राहू शकेल. जमा झालेले पाणी नंतर पंपाद्वारे अन्यत्र वळवले जाईल. या प्रस्तावावर पुढील तीन ते चार दिवसांत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे बांगर यांनी सांगितले. मात्र हे काम हाती घेतल्यास काही महिन्यांसाठी अंधेरी सब वे बंद ठेवावा लागेल आणि वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेचा उद्देश अंधेरी सब वेला कायमस्वरूपी पूरमुक्त करून मुंबईकरांची पावसाळ्यातील गैरसोय कमी करण्याचा आहे.







