पुणे : विकासाच्या नावाखाली वाढणारी वृक्षतोड आणि पर्यावरणावरील वाढता ताण ही चिंतेची बाब बनली असताना काही व्यक्ती निसर्गसंवर्धनासाठी निस्वार्थपणे कार्य करत आहेत. जुन्नर तालुक्यात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले रमेश खरमाळे हे त्यापैकी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. भारतीय सैन्य दलात तब्बल १७ वर्षे सेवा बजावल्यानंतर त्यांनी पर्यावरण संवर्धनाचे कार्य हाती घेतले आणि आज ते निसर्गरक्षणासाठी सातत्याने योगदान देत आहेत. डोंगराळ भागात वृक्षलागवड, जलसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीसारखे उपक्रम राबवत त्यांनी हरित क्षेत्र वाढविण्यासाठी मोठे कार्य केले आहे. दररोज विविध झाडांच्या बिया गोळा करून त्यातून रोपवाटिका तयार करणे आणि मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे हे त्यांच्या दैनंदिन कामाचा भाग बनले आहे. निसर्गाशी असलेली त्यांची बांधिलकी आणि जिद्द यामुळे अनेक भागांमध्ये पर्यावरण संवर्धनाला नवी दिशा मिळाली आहे.
२०१२ मध्ये सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर रमेश खरमाळे यांनी वनरक्षक म्हणून काम करताना पर्यावरणासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी 70 हून अधिक जलशोषक चर खोदून सुमारे ८ लाख लिटर पाणी जमिनीत मुरविण्याचे काम केले असून वन्यजीवांसाठी अनेक पाणवठेही तयार केले आहेत. लाखो बियांचे संकलन आणि वाटप करून डोंगर-दऱ्यांमध्ये बीजारोपण केले आहे. याशिवाय वनवा रोखण्यासाठी श्रमदान, जखमी पशुपक्ष्यांचे रेस्क्यू, शाळा-महाविद्यालयांमध्ये पर्यावरण जनजागृती आणि जुन्नरच्या ऐतिहासिक व नैसर्गिक वारशाची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाचे रजत पदक आणि इतर अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनासाठीचे त्यांचे योगदान आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.







