रायगड : दुर्गराज रायगड किल्ला येथे होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला प्रशासनाने वेग दिला असून, तारखेनुसार ६ जून आणि तिथीनुसार २६ जून २०२६ रोजी हा सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रमुख विभागांची दुरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, विविध विभागांचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील शासकीय विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आरोग्य, पाणीपुरवठा, परिवहन, मंडप, खानपान, विद्युत, स्वच्छता आणि शौचालय व्यवस्था यांसाठी स्वतंत्र समित्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. प्रत्येक समितीने सूक्ष्म नियोजन करून कार्यक्रम सुव्यवस्थित आणि यशस्वीपणे पार पाडण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले की, शिवराज्याभिषेक सोहळा हा राज्यासाठी ऐतिहासिक आणि भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा कार्यक्रम असून, रायगडावर येणाऱ्या हजारो शिवभक्तांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे प्रशासनाची जबाबदारी आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन गडावर वैद्यकीय पथके, स्ट्रेचर, औषधसाठा आणि सर्पदंशावरील औषधे उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्याचा विचार करून मंडप, भोजन, विद्युत आणि आरोग्य व्यवस्था सुसज्ज ठेवण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले. तसेच वाहनतळ, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यावर भर देण्यात आला. कार्यक्रमाच्या खर्चात काटकसरीचे धोरण अवलंबण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत केले.







