ठाणे : वाढत्या उन्हामुळे शहरातील पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असून, धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जूनपर्यंत उपलब्ध साठा टिकवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुण्यावर १० जूनपर्यंत बंदी घालण्यात आली असून, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच नागरिकांनी आणि व्यावसायिक आस्थापनांनी पाण्याचा अपव्यय टाळून त्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सध्या शहराची लोकसंख्या सुमारे २७ लाख असून, दररोज ५९० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असला तरी गरज ६२१ दशलक्ष लिटर इतकी आहे. त्यामुळे दररोज सुमारे ३१ दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता भासत आहे.
याशिवाय, जलवाहिन्यांच्या दुरुस्तीमुळे अधूनमधून पाणीपुरवठा खंडित होतो आणि त्यानंतर काही दिवस कमी दाबाने पाणी मिळते, त्यामुळे नागरिकांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील वाढते तापमान, घटलेली विहिरी आणि कूपनलिकांची पातळी यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व्हिस सेंटरमध्ये दोन, तीन आणि चारचाकी वाहनांची धुलाई व साफसफाई तात्पुरती बंद करण्यात आली आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नागरिकांना पाणी बचतीच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले असून, गाड्या किंवा अंगण धुणे, नळ चालू ठेवणे यांसारख्या गोष्टी टाळाव्यात, असे सांगितले आहे. दरम्यान, आयुक्त सौरभ राव यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.






