डोंबिवली : आपण महानगर गॅस देयक शुल्क भरणा केले असले तरी ते आमच्याकडे दिसत नाही. त्यामुळे आपण वेळेत देयक शुल्क तातडीने भरणा केला नाही तर आपली महानगर गॅसची जोडणी बंद होईल अशी भीती दाखवून एका भामट्याने डोंबिवलीतील सुनीलनगरमध्ये राहणाऱ्या एका नोकरदार महिलेची दोन लाख ९९ हजार ५०० रूपयांची ऑनलाईन व्यवहारातून फसवणूक केली आहे. या महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे. स्मिता राणे असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या नोकरदार आहेत. त्या कुटुंबीयांसह डोंबिवली सुनीलनगरमध्ये राहतात. त्यांच्या घरात महानगरचा गॅस पुरवठा गेल्या वर्षापासून होतो. वेळच्या वेळी ते गॅस देयकाचा शुल्क भरणा करतात. स्मिता राणे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की गेल्या आठवड्यात माझे पती यतीन राणे यांच्या मोबाईलवर महानगर गॅसकडून एक लघुसंदेश आला. त्यात आपण भरणा केलेले महानगर गॅसचे देयक आमच्याकडे दिसत नाही. त्यामुळे विहित वेळेत देयक शुल्क भरणा केला नाहीतर तुमच्या घराचे महानगर गॅसची जोडणी बंद होईल असे कळविले. पतीने हा संदेश पत्नीच्या मोबाईलवर पाठविला.
तक्रारदार स्मिता यांनी तातडीने लघुसंदेश आलेल्या मोबाईलवर संपर्क साधून आम्ही देयक भरणा केला आहे असे सांगितले. तुम्ही देयक भरणा केला असला तरी ते देयक आमच्या कार्यालयीन नोंदणीत ते दिसत नाही. ते दिसण्यासाठी आपण ऑनलाईन माध्यमातून काही प्रक्रिया पार पाडू शकता. असे बोलत असताना मोबाईल चालू ठेऊन अनोळखी इसमाने एक जुळणी स्मिता यांना पाठवली. ही जुळणी उघडत गेली तशा ऑनलाईन व्यवहाराच्या प्रक्रिया तक्रारदाराने पूर्ण केल्या. हे व्यवहार करत असताना तक्रारदार महिलेने क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचा वापर केला. परंतु, या दोन्ही सुविधांमधून व्यवहार पूर्ण होत नसल्याचे लघुसंदेश स्मिता राणे यांना आले. या सर्व प्रक्रिया करताना स्मिता यांचा अनोळखी इसमा बरोबरचा फोन चालू होता. ऑनलाईन व्यवहार प्रक्रिया पूर्ण होत नाही. मी नंतर या प्रक्रिया पार पाडते असे सांगून तक्रारदार महिलेने फोन बंद केला. तेवढ्या वेळेत समोरील अनोळखी भामट्याने स्मिता यांच्या बँकेतून ऑनलाईन व्यवहारातून क्रेडिट कार्डमधून दोन लाख रूपये काढून घेतले होते आणि डेबिट कार्डमधून ९९ हजार ५०० रूपयांची रक्कम काढून घेतली होती. या व्यवहारांचे लघुसंदेश बँकांमधून तक्रारदार महिलेला मोबाईलवर आले होते. या महिलेने तातडीने आपली कार्ड बँकेकडून व्यवहारासाठी ब्लॉक करून घेतली. महानगर गॅसचे कनेक्शन बंद होईल अशी भीती दाखवून अनोळखी भामट्याने आपली फसवणूक केली म्हणून तक्रारदार महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली आहे. आतापर्यंत गुंतवणुकीचे, वाढीव नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारे भामटे महानगर गॅस जोडणीच्या नावाने आता फसवणूक करू लागल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.







