अहिल्यानगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र अद्यापही धक्क्यातून सावरलेला नाही. ठिकठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारे फलक लावून नागरिक आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मात्र, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत शहरात नगरपंचायतीने हे श्रद्धांजलीचे फ्लेक्स हटवल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारावर आमदार रोहित पवार यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली नाराजी व्यक्त करत संबंधित प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर कर्जत शहरातील नागरिकांनी अत्यंत जड अंतःकरणाने त्यांना श्रद्धांजली वाहणारे फ्लेक्स लावले होते. मात्र, नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी हे फ्लेक्स अत्यंत वाईट पद्धतीने फाडून काढून टाकले. ही बाब समोर येताच रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे सरकारकडे दाद मागितली आहे. ही कृती केवळ फलक हटवणे नसून, नागरिकांच्या भावनांचा अनादर करणारी आणि त्यांच्या दुःखावर मीठ चोळणारी आहे, असा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटले की, “माझ्या मतदारसंघात नागरिकांनी दुःखी भावनेने लावलेले फ्लेक्स नगरपंचायतीने ज्या पद्धतीने काढले, ते संतापजनक आहे. हा अजितदादांचा अवमान आहे. सरकारने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी.” कार्यकर्त्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या अशा कृतींचे समर्थन होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.







