मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी समोर आल्यानंतर राज्यभर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्यभरात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करून २८ जानेवारी राज्यातील सर्व शाळांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्वतंत्र परिपत्रक काढून सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षकांना अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. तसंच त्या आदेशाच्या अनुषंगानं मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांनी देखील पत्रक काढलं आहे. या आदेशानुसार प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण विभागातील महाराष्ट्रातील सर्व शाळांना ही सुटी लागू राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तीव्र हळहळ व्यक्त होत आहेत. अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विकासकामांची आठवण काढत कार्यकर्ते आणि नागरिक भावुक झालेत. दरम्यान, विद्यार्थ्यांवर मानसिक परिणाम होऊ नये, तसंच शोकभावना व्यक्त करण्यासाठी शिक्षण विभागानं बुधवारी तातडीनं सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याचं आदेशात नमूद केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचं वृत्त समजल्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचं वातावरण पसरलं आहे. आपापल्या शहरातील पक्ष कार्यालयांमध्ये जमलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. पक्षातील महिला कार्यकर्त्यांनी आपला भाऊ गेल्याची भावना व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा दुखवटा म्हणून मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यापर्यंत खाली घेण्यात आला आहे. “राज्यात आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. हे नुकसान कधीही भरून न निघणारे आहे. महाराष्ट्रातून असे लोकनेते गेले, की जी पोकळी निर्माण होते ती भरून काढणे अत्यंत कठीण असते. अजितदादा गेले, यावर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दु:ख व्यक्त केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातात बुधवारी मृत्यू झाला. अजित पवार यांच्या मृत्यूमुळं राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी ११ वाजता बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राज्यातील मंत्री उपस्थित असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सन्मानार्थ राज्यात २८ ते ३० जानेवारी दरम्यान तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळला जाणार आहे. या काळात सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवले जातील.







