मुंबई : महाराष्ट्रातील महापालिकेचा रणसंग्राम शिगेला आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या ठाकरे बंधुंची आज संयुक्त मुलाखत प्रसारित झाली. ही मुलाखत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली. या मुलाखतीत ठाकरे बंधूंने सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. तसंच मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक समस्यांवर त्यांनी भाष्य केलं. तर याच मुलाखतीत महेश मांजरेकर यांच्या एका विधाननंतर भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. या मुलाखत महेश मांजरेकर मुंबईसंबंधात असं म्हणाले की, ‘गेल्या तीन वर्षांत महानगरपालिका निवडणुका झाल्याच नव्हत्या. मग त्या तीन वर्षांत मुंबई धोक्यात नव्हती का? एक मुंबईकर म्हणून जेव्हा मी आज घराबाहेर पडतो, तेव्हा मला लाज वाटते की माझी मुलं या शहरात वाढणार आहेत.
महेश मांजरेकर यांनी केलेल्या विधानावर आशिष शेलार म्हणाले की, महेश मांजरेकर हे एखाद्या पक्षाचा प्रचार करत असतील तर आमचं काही म्हणणं नाही. पण ते अभिनेता म्हणून आपण निष्पक्ष आहोत, असे दाखवून एखाद्या पक्षाचा प्रचार करणार असतील, तर मांजरेकरांनाही सडेतोड प्रत्युत्तर देऊ. त्यांनी अटल सेतू आणि कोस्टल रोडने प्रवास केला नाही का? त्यांना उपनगरीय रेल्वेतून फिरण्याची माहिती आहे का, ते अॅक्वा मेट्रोतून फिरलेत का? त्यामुळे महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये आणि पडायचं असेल तर त्यांना आम्ही दाखवू आता थांबायच नाय.







