मुंबई : मुंबई – अहमदाबाद अंतर दोन ते अडीच तासात पार करता यावे यासाठी महत्त्वाकांक्षी असा मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पातील पहिले स्थानक वांद्रे – कुर्ला संकुल असून या स्थानकाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, बीकेसीतील कामादरम्यान वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने बुधवारी बुलेट ट्रेनच्या कामास ‘काम बंद’ नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता हे काम बंद करण्यात झाले आहे. या प्रकल्पात आवश्यक त्या सुधारणा जोपर्यंत केल्या जात नाहीत तोपर्यंत आता काम बंद राहणार आहे. त्याचा फटका बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामास बसण्याची शक्यता आहे. नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) ५०८ किमी लांबीचा मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राबवित आहे. देशातील हा पहिला हाय स्पीड ट्रेन प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्णत: कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पातील पहिले आणि महत्त्वाचे स्थानक बीकेसी येथे बांधण्यात येत आहे. या स्थानकाच्या कामाअंतर्गत सध्या खोदकाम सुरू आहे.
या कामादरम्यान एनएचएसआरसीएलकडून वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन होत असल्याची बाब पालिकेच्या तपासणीदरम्यान निदर्शनास आली. त्यानंतर पालिकेकडून कारणे दाखवा नोटीस बजावून आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आदेश पालिकेने एनएचएसआरसीएलला दिले. या नोटीशीनंतरही प्रकल्पात वायू प्रदूषण नियंत्रणांच्यादृष्टीने आवश्यक त्या सुधारणा न झाल्याने बीकेसीतील वायू प्रदूषणास, हवेची गुणवत्ता ढासळण्यास हा प्रकल्प जबाबदार ठरत असल्याचे समोर आले. या प्रकल्पाच्या कामामुळे होणाऱ्या प्रदूषणावर उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त करून पालिकेवर ताशेरे ओढून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेच्या पथकाने बुधवारी बीकेसी बुलेट ट्रेन स्थानकांच्या कामासह वांद्रयातील उच्च न्यायालय संकुलाच्या पाडकामाची पाहणी केली. पालिकेच्या पाहणीत प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात न आल्याने अखेर काम बंदची नोटीस देण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. काम बंद नोटीस बजावण्यात आल्याने बुलेट ट्रेनचे काम आवश्यक त्या सुधारणा होईपर्यंत बंद राहणार आहे. सुधारणा केल्यानंतर काम पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे.







