पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुणे येथे ‘पुणे बुक फेस्टिवल–2025’ उपस्थिती दर्शवली, यावेळी राजेश पांडे लिखित ‘युवा भारताच्या लोकसहभागाची गिनीजगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला नवी दिशा आणि दालन मिळाले आहे. पुणेकर नेहमीच कुठल्याही ज्ञान आधारित कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. तसाच प्रतिसाद पुणेकरांनी या पुस्तक महोत्सवालासुद्धा दिला. आज हा पुस्तक महोत्सव भारतातील एक प्रतिष्ठित महोत्सव म्हणून ओळखला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तंत्रज्ञान कितीही बदलले तरी देखील पुस्तकांचे अभिजात सौंदर्य आणि ज्ञान हे पिढ्या आणि सर्व वयोगटातील लोकांना भावते, त्यामुळेच नॅशनल ट्रस्टने सुरु केलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळतो. पुस्तक असो किंवा इतर सर्व प्रकारचे ज्ञान, त्याचे संपादन आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करते आणि याच प्रक्रियेत आपले व्यक्तिमत्त्व घडत असते, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. पुणे पुस्तक महोत्सवाच्या विस्तारामुळे नागपूरमध्ये देखील पुस्तक महोत्सवास प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्याच प्रमाणे फेब्रुवारीत गोव्यात होणाऱ्या पुस्तक महोत्सवाला देखील प्रचंड प्रतिसाद मिळेल. आपल्या लेखकांनी, जाणकारांनी साहित्याच्या माध्यमातून सातत्याने महाराष्ट्राचा विचार रुजवण्याचे काम केले. महाराष्ट्राची परंपरा पुढे नेण्यासाठी पुस्तक महोत्सव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात भारताजवळ ‘स्किल’ आणि ‘स्केल’ आहे. आपल्याकडे स्किल आपली लोकसंख्या आहे. जेव्हा ही लोकसंख्या सकारात्मक कार्याला वाहून घेते त्यावेळी जगाच्या पाठीवर ती आपले नाव कोरते, त्याच पद्धतीने आपल्या तरुणाईला आणि समाजाला एक दिशा देऊन एका चांगल्या कार्याला प्रेरित करण्याचा प्रयत्न राजेश पांडे यांनी ‘युवा भारताच्या लोकसहभागाची गिनीजगाथा’ या पुस्तकाच्या माध्यमातून केला, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.







