मुंबई : मुंबईतील मराठी शाळा आणि मुलांचे शिक्षण टिकवण्यासाठी पालकांनी पुढे येणे आवश्यक आहे, असे आवाहन मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार यांनी केले. संत कक्कय मार्ग शाळा संकुल येथे मराठी शाळा पाडण्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनावेळी ते बोलत होते. या वेळी अभिनेत्री व मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमीत, आम आदमी पक्षाच्या प्रणाली राऊत, माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश हेगिष्टे आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. पवार म्हणाले, मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा यायला हवी. धर्म कोणताही असो मुस्लिम, हिंदू किंवा ख्रिश्चन स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. मुलांना मराठी माध्यमात शिकवले पाहिजे, त्यासाठी शाळा टिकल्या पाहिजेत. पण आज महापालिका धोकादायक नसलेल्या शाळांनाही पाडण्याच्या नोटिसा देत आहे. ही ‘बुलडोझरशाही’ आम्ही चालू देणार नाही.







