पुणे : साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपये किंमतीचे विद्युत साहित्य चोरीला गेल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिर्डी पोलिस ठाण्यात साई संस्थानच्या ४७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून करण्यात आली आहे. काळे यांनी २०२२ साली संस्थानच्या विद्युत विभागात मोठ्या प्रमाणात साहित्य गायब झाल्याची तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून पोलिसांनी प्राथमिक तपासामध्ये लाखो रुपयांच्या चोरीची पुष्टी केली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये त्या काळातील विभाग प्रमुख, अभियंते, सहाय्यक कर्मचारी आणि इतर संबंधित अधिकारी यांचा समावेश आहे. शिर्डी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे साई संस्थान प्रशासनात मोठी खळबळ माजली असून, या प्रकरणाचे सर्व तपशील लवकरच समोर येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.







