मुंबई : पश्चिम उपनगरातून आता दक्षिण मंबईत पोहोचणे सोप्पे होणार आहे. गेल्या कित्येत दिवसांपासून प्रतीक्षा असलेली मेट्रो ३चे लवकरच उद्घाटन होणार आहे. आरे ते कफ परेडदरम्यानची भुयारी मेट्रो येत्या ८ ऑक्टोबरला पूर्णपणे खुली होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण केले जाणार आहे. मुंबई मेट्रो 3 अॅक्वा लाइन म्हणून ओळखली जाते. सध्या आरे ते वरळीच्या आचार्य अत्रे चौक स्थानकापर्यंत मेट्रोच्या फेऱ्या सुरू आहेत. तर अंतिम टप्पा हा वरळी सायन्स म्युझियम स्थानक ते कफ परेड असा असेल. या मार्गावर ११ स्थानके असून हा अंतिम टप्पा ८ ऑक्टोबर रोजी खुला होणार आहे.
अॅक्वा लाइनचा शेवटचा टप्पा १०.९९ किमीचा असून या मेट्रो मार्गिकेमुळं मुंबईकर आरे ते कुलाबा फक्त ६० मिनिटांत प्रवास करु शकणार आहेत. पहिले या प्रवासासाठी दोन तासांचा वेळ लागायचा मात्र आता अवघ्या काही मिनिटांत हा प्रवास होणार आहे. आरे ते कुलाबा पर्यंत असलेल्या ३३.५ किमीचा प्रवास नागरिकांना एका तासात आणि ७० रुपयांत करता येणार आहे. पण हाच प्रवास जर तुम्ही रस्ते मार्गाने करायला गेलात तर ५०० रुपयांपेक्षा जास्त खर्च होतात. त्यामुळं अॅक्वा लाइनचा अधिक आरामदायक आणि सोप्पा ठरणार आहे. ही मार्गिका पूर्णपणे खुली झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील नागरिकांना दक्षिण मुंबईतील मंत्रालय, विधान भवन आदी विविध सरकारी कार्यालयांत जाणे सोयिस्कर ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन अशा स्थानकांमुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान बनण्याची चिन्हे आहेत. तसंच, मुंबई विमानतळाहून कफ परेडला अवघ्या ४५ मिनिटांत पोहोचता येणार आहे.







