वृत्तसंस्था : राज्यातील सर्वसामान्य मतदारांना आकृष्ट करण्यासाठी महायुती सरकारने सुरु केलेली आणखी एक योजना आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारची शिवभोजन थाळी ही योजना जवळपास बंद पडल्यात जमा असताना आता ‘आनंदाचा शिधा’ या लोकप्रिय योजनेचीही तीच गत होण्याची शक्यता आहे. राज्यातील गोरगरीब जनतेला सणासुदीच्या काळात घरात गोडधोड करता यावे, यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरु केली होती. या योजनेतंर्गत दिवाळी आणि इतर सणांच्या काळात रेशनच्या दुकानांवर किट वितरित केले जायचे. यामध्ये एक किलो चणा डाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल यांचा समावेश होता. तो लाभार्थ्यांना फक्त १०० रुपयांत दिला जायचा. २०२३ मध्ये गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी या सणांच्या निमित्ताने, तसेच २०२४ मध्ये अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सरकारने ‘आनंदाचा शिधा’ किटचे वितरण केले होते. मात्र, यंदा राज्य सरकारकडून गणेशोत्सव आणि त्यानंतर दिवाळीत आनंदाचा शिधा वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही योजनाही बंद होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
यंदा मराठवाडा आणि सोलापूरमध्ये अतिवृष्टी झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शेती आणि घरादारांचे नुकसान झाल्यामुळे येथील सामान्य जनता हवालदिल झाली आहे. अशा परिस्थितीत किमान या परिसरात तरी सरकारकडून ‘आनंदाचा शिधा’ पुरवला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दिवाळी येऊन ठेपली असताना सरकारी पातळीवर कोणत्याही हालचाली सुरु नसल्याने यंदा या भागांमध्येही ‘आनंदाचा शिधा’ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.







