वृत्तसंस्था : टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने (Microsoft) एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या Windows 10 ऑपरेटिंग सिस्टमसाठी असणारा ‘सपोर्ट’ (Support) लवकरच बंद केला जाणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर २०२५ ही Windows 10 च्या समर्थनाची अंतिम तारीख असणार आहे. या तारखेनंतर, Windows 10 वापरणाऱ्या डिव्हाईसला कोणतेही नवीन सुरक्षा अपडेट्स (Security Updates), फीचर्स किंवा तांत्रिक मदत (Technical Support) मिळणार नाही. Windows 10 वापरणाऱ्या सर्व युजर्ससाठी ही एक महत्त्वाची सूचना आहे. आपले डिव्हाईस आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी Windows 11 कडे जाण्याचा किंवा ESU प्रोग्रामचा विचार करणे आवश्यक आहे, असे कंपनीने म्हटले आहे. मायक्रोसॉफ्टने सर्व युजर्सना सोयीसाठी आणि डेटा सुरक्षिततेसाठी Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमवर हळूहळू अपग्रेड (Upgrade) करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, Windows 11 मध्ये, पूर्वीच्या व्हर्जनच्या तुलनेत सुरक्षा-संबंधित समस्यांमध्ये 62% कपात झाली आहे आणि कामाचा वेग 50% पर्यंत वाढतो.