मुंबई : मुंबईतील बोरीवलीच्या पूर्व महाकालीनगर कॉम्प्लेक्स या गृहनिर्माण प्रकल्पात शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे सुरू आहे.
२०११ साली प्रॉपर्टी एजंट जगदीश त्रिपाठी यांच्या माध्यमातून अमोघ एंटरप्रायझेस (भागीदार – राजाराम बाबला मंजवकर, अमोघ राजाराम मंजवकर व राजश्री राजाराम मंजवकर) यांच्या प्रकल्पात अनेकांना फ्लॅट घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. ठाण्यातील अशोक नारायण उतेकर व अनिल गुंडोजी झिंगाडे यांच्यासह गुंतवणूकदारांकडून बाजारभावापेक्षा कमी किमतीत फ्लॅट मिळणार असल्याचे सांगत टप्प्याटप्प्याने रक्कम उकळण्यात आली. ग्राहकांकडून एकूण सुमारे ३८ लाख रुपये आकारण्यात आले. मात्र भागीदारांतील वादामुळे प्रकल्प थांबला असल्याचे कारण पुढे करून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले. अशाप्रकारे सुमारे २०० हून अधिक लोकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून अनेकांकडून कोट्यवधी रुपये उकळले गेले आहेत. या प्रकरणात कस्तुरबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सुरू आहे.







