मुंबई : दिवाळीच्या तोंडावर गावी जाणाऱ्या एसटी प्रवाशासांठी मोठी आहे. एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली प्रस्तावित १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला आहे. मंगळवारी या भाडेवाढीची घोषणा करण्यात आली होती, तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी ती भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाने दिवाळीच्या तोंडावर, १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या दरम्यान १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याची घोषणा केली होती. दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रवाशी एसटीचा प्रवास करतात. त्यामुळे या काळात महसूल वाढीसाठी महामंडळाने हा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयावर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. आता ही भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. दिवाळीसाठी करण्यात आलेली एसटीची भाडेवाढ तत्काळ रद्द करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. महाराष्ट्रातील सध्याची पूर परिस्थिती लक्षात घेऊन ही भाडेवाढ रद्द करावी असे एकनाथ शिंदे यांनी सुचविले होते. त्यावर प्रताप सरनाईक यांनी ही भाडेवाढ रद्द करण्याचे एसटी प्रशासनाला आदेश दिले.







