वृत्तसंस्था : एसटी कर्मचारी कृती समितीने दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रलंबित मागण्यासाठी कृतिसमितीने पुन्हा एकदा एल्गाराचे हत्यार उपसले आहे. मागण्या मान्य न झाल्यास १३ ऑक्टोबरपासून आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव फरक लवकर द्या, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात ग्रामीण महाराष्ट्र पुन्हा एकदा वाहतुकीच्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वी आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेल्या काही वर्षांत एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागले आहेत. आजही एसटी बस हीच प्रवासाचं प्रमुख साधन मानलं जातं. खेड्यातील विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत आणि कामगारांपासून गृहिणींपर्यंत बहुसंख्य लोकांची रोजीरोटी ही एसटीवर अवलंबून आहे. त्यामुळे हा संप प्रत्यक्षात आला तर ग्रामीण महाराष्ट्राचं दैनंदिन जीवन विस्कळीत होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.







