मुंबई : अॅप आधारित टॅक्सी चालकांच्या मागण्या मान्य न झाल्याने आणि उबरने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने, चालकांनी उबर अॅप ‘अनइन्स्टॉल’ करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे प्रवाशांना उबरवरील टॅक्सी सेवा मिळणे अवघड होण्याची शक्यता आहे. परंतु, चालक आणि अॅग्रीगेटर्स कंपनीच्या वादात प्रवासी भरडला जाणार आहे.
दरम्यान, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित केलेले दर सर्व अॅप आधारित सेवेसाठी लागू केले जावे, अशी मुख्य मागणी चालकांची होती. तसेच, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे दर आकारल्यामुळे, प्रवाशांच्या तक्रारीची शहानिशा न करता किरकोळ कारणांवरून परस्पर आयडी ब्लॉक केले होते, ते सर्व आयडी त्वरित चालू करावेत, अशी मागणी संप काळात चालकांनी लावून धरली होती. गुरुवारी झालेल्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्याने, ‘ओन्ली मीटर’द्वारे प्रवासी भाडे आकारणे बंद होण्याची शक्यता आहे.







