मुंबई : पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांची कठोर तपासणी करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार मागील तीन वर्षांमध्ये मान्यता मिळालेल्या तब्बल १५० संस्थांची तपासणी होईल. यामध्ये वर्गखोल्यांचा आकार, प्राध्यापक संख्या, आवश्यक सोयीसुविधा तपासल्या जाणार आहेत. या सर्व संस्थांची तपासणी ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभाग या संस्थांवर कारवाईबाबत निर्णय घेणार आहे.
औषधनिर्माणशास्त्राच्या ‘बी. फार्म’ आणि ‘डी. फार्म’ या अभ्यासक्रमासाठी असलेल्या संस्थांची संख्या गेल्या तीन वर्षांत सुमारे दीडशेने वाढली. २०२२-२३ मध्ये फार्मसीचा पदवी अभ्यासक्रम म्हणजेच ‘बी. फार्म’ शिकविणाऱ्या ३९६ संस्था होत्या. याच काळात ‘डी. फार्म’ म्हणजेच पदविका अभ्यासक्रम शिकवणाऱ्या ४९२ संस्था होत्या. २०२४-२५ पर्यंत बी. फार्म संस्थांची संख्या ५१५ तर डी. फार्म संस्थांची संख्या ६८५ वर पोहचली आहे. या सर्व संस्थांना भारतीय औषध निर्माणशास्त्र परिषदेकडून मान्यता मिळाली असली तरी त्या सर्व निकष पूर्ण करतात का, याची तपासणी राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे.







