ठाणे : डोंबिवली परिसरातील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून त्यांना शेअरमध्ये वाढीव नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरू आहेत. डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात दोन सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांनी तक्रारी करून आपली शेअर गुंतवणुकीच्या माध्यमातून अनुक्रमे दोन कोटी एक लाख ९२ हजार आणि दोन कोटी ८५ लाख रूपयांंची फसवणूक झाल्याची तक्रार विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली आहे.
डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर परिसरात चंद्रकांत दत्ताराम सरवटे (६३) हे ज्येष्ठ नागरिक कुटुंबीयांसह राहतात. ते सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी आहेत. एप्रिल २०२५ ते जून २०२५ या कालावधीत त्यांची शेअर गुंतवणुकीच्या माध्यमातून फसवणूक झाली आहे. अमेरिकन सेंच्युरी इन्व्हेस्टमेंट कंपनी आणि अनुप्रित दागा, एस. एम. सी. ग्लोबल सिक्युरिटी कंपनी यांनी संगनमत करून ही फसवणूक केली आहे, असे तक्रारदार सरवटे यांनी तक्रारीत म्हटले आहे. सरवटे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की एप्रिल महिन्यात गुन्हा दाखल कंपनीतील इसमांनी आपणास आपल्या मोबाईलवर संपर्क साधला. आपण शेअर बाजारात गुंतवणूक केली तर आपणास अधिकचा नफा मिळेल असे आश्वासन दिले. अमेरिकन सेंच्युरी इन्व्हेस्टमेंट कंपनी आणि अनुप्रित दागा एस. एम. सी ग्लोबल सिक्युरिट कंपनीतून आपण बोलतो असे हे इसम आपणास सांगत होते. आपणास शेअर गुंतवणुकीतील ऑनलाईन माध्यमातील माहिती संबंधितांनी दिली. शेअर गुंतवणुकीतून अल्प कालावधीत अधिकचा नफा मिळतो म्हणून आपण गुन्हा दाखल इसम सांगतील त्याप्रमाणे आपल्या स्वताच्या आणि पत्नीच्या बँक खात्यांमधून इसमांना ऑनलाईन माध्यमातून टप्प्याने त्यांनी दिलेल्या बँँक खात्यावर रक्कम पाठवली.







