मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी १२ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी म्हटले की, या ऐतिहासिक वास्तूंवरील सर्व अनधिकृत बांधकामे हटवली पाहिजेत, मग हे अतिक्रमण करणारे कोणत्याही समुदायाचे असोत. इतकंच नाही तर राज ठाकरे इशारा देत म्हणाले की, सरकारने जागतिक वारसा दर्जा हलक्यात घेऊ नये, कारण जर नियमांचे योग्य पालन केले नाही तर तो काढून घेतला जाऊ शकतो.
मराठा शासकांच्या तटबंदी व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारे ‘मराठा लष्करी भूदृश्य’ युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक वारसा समितीच्या (WHC) ४७ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘मराठा लष्करी भूदृश्य’मध्ये महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजय दुर्ग आणि सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूतील गिंगी किल्ल्यांचा समावेश आहे.







