पुणे : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह काडतूस जप्त करण्यात आले आहे. गणेश गौतम वाघमारे (वय २८), तेजस काशीनाथ शेलार (वय २५, दोघे रा. सर्व्हे क्रमांक १३०, दांडेकर पूल, सिंहगड रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वाघमारे आणि शेलार हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. वाघमारे याच्यावर पर्वती पोलिसांकडून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत तो जामीन मिळवून कारागृहातून बाहेर पडला आहे.
वाघमारे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असून, तो दांडेकर पूल भागात दहशत माजवित असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार राजेंद्र लांडगे, पोलीस शिपाई अमर पवार, मयूर भोकरे यांना बातमीदाराने दिली होती. नंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून वाघमारे याला पकडले. वाघमारे याच्याकडे पिस्तुलाबाबत चौकशी करण्यात आली. तेव्हा माझ्याकडे पिस्तूल आहे. मात्र, ते शेलार याने विकत घेतल्याची माहिती त्याने दिली. प्रतिस्पर्धी टोळीकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याने दोघे पिस्तूल बाळगत असल्याची, माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शेलारला ताब्यात घेतले. शेलार याच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तूलासह दोन काडतुसे जप्त करण्यात आली. दोघांवर पर्वती पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, उपनिरीक्षक अस्मिता लाड आदी पोलिसांनी ही कारवाई केली.







