पुणे : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चर्चेत आलं आहे. या रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्या कुटुंबाकडे १० लाख रुपये अनामत रक्कम मागितली ती वेळेत न भरता आल्याने साडेपाच तास तनिषा भिसे या रुग्णालयात उपचारांविना होत्या, तसंच पुढे त्यांना आणखी दोन रुग्णालयांत नेण्यात आलं. ज्यानंतर मणिपाल रुग्णालयात त्यांची प्रसूती झाली आणि त्यांनी दोन मुलींना जन्म दिला. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वच स्तरात संताप व्यक्त होतो आहे. दरम्यान दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशनला ही जागा खिलारे कुटुंबाने दिली होती. ही जागा कशी मिळाली? त्याबाबत भाऊसाहेब खिलारेंचे वारस चित्रसेन खिलारे यांनी भाष्य केलं आहे.
चित्रसेन खिलारे असं म्हणतात कि , “एरंडवणे भागातील जमिनी आमच्या पूर्वजांकडे होत्या ज्या त्यांनी दान केल्या होत्या. १९८९ च्या दरम्यान लता मंगेशकर यांनी भाऊसाहेब खिलारे यांच्याकडे विचारणा केली की आम्हाला वडिलांच्या नावाने म्हणजेच दीनानाथ मंगेशकरांच्या नावाने रुग्णालय सुरु करायचं आहे तर पुण्यात जागा मिळू शकेल का? त्यावर भाऊसाहेब खिलारे यांनी ती जागा उपलब्ध करुन दिली. लता मंगेशकर या पुण्यातल्या नवी पेठ भागात वास्तव्यास होत्या तेव्हापासून माझे वडील आणि लता मंगेशकर यांचा चांगला परिचय होता. त्यानंतर आत्ताची जागा त्यांनी लता मंगेशकर यांना सुचवली. त्यावेळी बहुदा शरद पवार मुख्यमंत्री असतील. त्यांची आणि लता मंगेशकर यांची भेट झाली आणि त्यांनी जागेसाठी मागणी केली. त्या दरम्यान यूएलसी कायद्यानुसार पुण्यातल्या जमिनी त्या कायद्याच्या अंतर्गत आल्या होत्या.” तसेच “आमच्या वडिलांची धारणा होती की एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हाताला समजता कामा नये. त्यांनी कधीही कुठेही श्रेय घेतलं नाही. उदाहरण म्हणून सांगतो, एरंडवणे गावठाण भागातील म्हात्रे पुलाजवळ महादेव मंदिर होतं, ते पुरातन होतं. छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेल्याचा उल्लेखही त्याबाबत होता. ते मंदिर रस्त्यात येत होतं आणि ती जागा आमच्याकडे महापालिकेने मागितलं. माझ्या वडिलांनी तातडीने होकार दिला आणि सांगितलं की जनहितासाठी हे काम होतं आहे. रस्ता रुंदीकरण महत्त्वाचं आहे तर आपण मंदिर दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करु त्या दरम्यान अनेक संघटना आल्या आणि जागा का देत आहात ही विचारणा केली. तेव्हा भाऊसाहेब खिलारे निर्णयावर ठाम राहिले होते. खिलारे कुटुंबाची जागा दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशनला दिली हा विषय गौण आहे मात्र तिथे जे घडलं ती घटना दुर्दैवी आहे असं चित्रसेन खिलारे म्हणाले आहेत.”







