नागपूर : विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे गेल्या पावणेतीन वर्षांपासून राज्यातील अनेक निवडणुका रखडलेल्या आहेत, आणि राजकीय पक्ष २२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणीची वाट पाहत आहेत. तरीदेखील, ४ जानेवारी रोजीच सुनावणी होण्याची शक्यता आहे, आणि तीन महिन्यांत निवडणुका होणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल संकेत दिले आहेत. नागपुरात भाजप कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फडणवीस यांनी ‘मन की बात’ मांडली. विधानसभेतील विजयामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असून, भाजपसाठी ‘फेव्हरेबल’ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा विजय साधण्यासाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे. यासाठीच नवनियुक्त मंत्री, आमदार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विधानसभेतील विजयामुळे सरकार, लोकप्रतिनिधी व पक्षावरील जबाबदारी वाढली आहे. सर्वांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. सरकार व जनतेदरम्यान समन्वय साधला जातो, हे महत्त्वाचे आहे. योग्य समन्वय असल्यास काय घडू शकते, हे विधानसभेच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत एक प्रकारची जादू केली, असे फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे लोकप्रतिनिधी व पक्षातील पदाधिकाऱ्यांची शिस्तही सांगितली. पक्ष संघटनेत केवळ ठरावीक कार्यकर्ते आणि जिल्ह्यांचाच पुढाकार असू नये. पदाधिकारी आणि नेत्यांनी भाषण करण्यापेक्षा काम करण्यावर अधिक लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे. अधिवेशनाच्या सहा दिवसांत भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांपैकी ९५ टक्क्यांनी फक्त फोटो काढले, असे फडणवीस म्हणाले. आता त्यांना कामावर लक्ष केंद्रित करायला हवे. जेव्हा सत्ता असते, तेव्हा लोकप्रतिनिधी आणि संघटनेमध्ये अंतर येते. संघटना हे आपले शस्त्र आहे आणि ते धारदारच असावे लागते. त्यामुळे संघटनेशी योग्य समन्वय राखला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवायचा असेल, तर सदस्यता नोंदणीवर जोर द्यावा लागेल. राज्यात दीड कोटी सदस्य नोंदणी करावी लागेल. प्रत्येक बूथावर १५० सदस्यांची नोंदणी करण्याचे लक्ष ठरवले पाहिजे. ५ जानेवारीला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन ५० सदस्यांची नोंदणी करायला हवी, ज्यामुळे ५० लाखांचा टप्पा काही तासांत गाठता येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांवर उतरून जनतेत काम करायला हवे, फक्त भाषणे देऊन दुसऱ्यांवर काम ढकलण्याची पद्धत योग्य नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी मंचावर विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, राष्ट्रीय सहसंगठन महासचिव शिवप्रकाश, सचिव अरविंद मेनन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकजा मुंडे, रणधीर सावरकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, ॲड. धर्मपाल मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.





