मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून एकूण १७ नवीन महाविद्यालये सुरु करण्यास प्रस्तावित करण्यात आली असून, त्यातील १५ महाविद्यालये बहुविद्याशाखीय कौशल्यविकासाधारित तर २ महाविद्यालये पारंपरिक उपयोजित स्वरूपाची आहेत. अधिष्ठाता मंडळाने तयार केलेला हा वार्षिक बृहत आराखडा सर्वसाधारण अधिसभेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. बृहत आराखड्याबरोबरच विद्यापीठाचे २०२३-२४ चे वार्षिक लेखे, ३१ मार्च २०२४ चा ताळेबंद, मुंबई विद्यापीठाचे सांविधिक लेखा परिक्षक यांनी सादर केलेले लेखापरिक्षण अहवाल अधिसभेत मंजूर करण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या अधिसभेसाठी प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्यासह अधिसभेत ७० हून अधिक सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ अन्वये अधिष्ठाता मंडळाकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ते २०२८-२९ या पंचवार्षिक बृहत आराखड्यातील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एकूण १३ आणि शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील रिक्त बिंदुतील २ पारंपारिक उपयोजित महाविद्यालये अशी एकूण १५ महाविद्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत. या महाविद्यालयांचा बृहत आराखडा अधिष्ठाता मंडळाने तयार केला. त्यानंतर व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेच्या बैठकीत याअनुषंगाने ठराव करण्यात आला व शासनाच्या मान्यतेसाठी म्हणून अधिसभेपुढे ठेवून मंजूर करण्यात आला. अधिसभेच्या कार्यक्रम पत्रिकेतील मुंबई विद्यापीठाच्या विविध विभाग, केंद्रे, शाळा आणि संस्थांना स्वायत्त दर्जा देण्याबाबतचे परिनियम आणि विविध विभाग, संस्था आणि केंद्रातील विभाग प्रमुख व संचालक यांच्या फेरपालटासंदर्भातील परिनियमही अधिसभेत मंजूर करण्यात आले. अधिसभेने महाविद्यालयांच्या प्रस्तावाला अखेरीस मंजुरी दिली असली तरी सदस्यांनी यातील नव्या महाविद्यालयांच्या संकल्पनांवर गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत.
कौशल्याधारित नवीन महाविद्यालये
मुंबई शहर व उपनगर
• दादर (पश्चिम)-१
• दक्षिण मुंबई-१
• मालाड (पश्चिम)-१
• मुलुंड (पूर्व)-१
• कांदिवली (पूर्व)-१
ठाणे जिल्हा
• शहापूर (मोहीली-अघाई)-१
• अंबरनाथ (चरगाव/लवाले)-१
पालघर जिल्हा
• सफाळे-1 जव्हार (तळवली)-१
• वानगाव-१
सिंधुदुर्ग जिल्हा
• कुडाळ (ओरस)-१
रायगड जिल्हा
• अलिबाग (सासवणे/मांडवा)-१
• अलिबाग शहर-१
रत्नागिरी जिल्हा
• रत्नागिरी शहर-१
• दापोली (उंबराळे व्हिलेज)-1१२
पारंपरिक उपयोजित महाविद्यालये :
• भिवंडी बी.एस्सी (आयटी)
• गावदेवी डोंगरी, अंधेरी बीए, बीकॉम