रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा राष्ट्रीय अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातील तब्बल १७२ खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एसव्हीजेसीटी क्रीडा प्रबोधिनी, डेरवण येथे झालेल्या या स्पर्धेत विविध अॅथलेटिक्स प्रकारांमध्ये खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. स्पर्धेतील उत्कृष्ट प्रदर्शनाच्या आधारे १३ खेळाडूंची १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान हैदराबाद (तेलंगणा) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील युवा खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. स्पर्धेचे आयोजन रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कदम आणि उपाध्यक्ष औकांत पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. ‘खेलो इंडिया’चे प्रशिक्षक अविनाश पवार यांनी खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी अंतिम निवड केली. स्पर्धेतील विविध प्रकारांमध्ये प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना पदके आणि प्रमाणपत्रे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सैफन चरके, अविनाश पवार, शिवा माळी आणि संघटनेचे सचिव संदीप तावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या स्पर्धेत त्रिक्रीडा, ६० मीटर धावणे, ६०० मीटर धावणे, ८० मीटर अडथळा शर्यत, लांब उडी आणि उंच उडी अशा विविध प्रकारांचा समावेश होता. त्रिक्रीडा प्रकारात दश शिगवण, सार्थक सुतार, निदिश वारे, अनुष्का राणे, आरोही शिर्के आणि स्वराली गोवळकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. धावण्याच्या स्पर्धांमध्ये वेदांग चितळकर, रोमित जाधव, वेदिका जगदाळे, सांची चव्हाण, वेदात पाटील आणि चिन्मयी शिगवण यांनी चमकदार प्रदर्शन केले. तर अडथळा शर्यत आणि उड्यांच्या प्रकारात आदित्य पातेरे, मंथन वारे, सोहम कुळये, मोहम्मद अन्सारी, कांती कांबळे, आर्या जाधव आणि निधी शिगवण यांच्यासह अनेक खेळाडूंनी पदके पटकावली. डेरवण येथे झालेल्या या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळाले असून, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू हैदराबाद येथे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या यशामुळे जिल्ह्यातील अॅथलेटिक्स क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली असून, भविष्यात आणखी खेळाडू राष्ट्रीय स्तरावर झळकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

