नवी मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने तयारी पूर्ण केली आहे. मुंबई बाहेरील प्रवाशांना चैत्यभूमी आणि राजगृह येथे पोहोचण्यासाठी दादर, सीएसएमटीसाठी १५ विशेष मेल, एक्स्प्रेसची घोषणा केली आहे. रविवारी सामान्य वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालवण्यात येणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर स्थानकात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वेवरील तिन्ही स्थानकांत एकूण ५७० रेल्वे पोलिस आणि ३५० रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी, कर्मचारी तैनात असणार आहेत. अनुयायांच्या गर्दीला मार्गदर्शन आणि सूचना देण्यासाठी १३५ टीसींची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातील रेल्वे फलाट, पादचारी पूल, प्रवेशद्वार या ठिकाणी रेल्वे पोलिस आणि आरपीएफ यांचे ७०० अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. स्थानक परिसरात १६० सीसीटीव्हींच्या मदतीने देखरेख ठेवण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त १२ विशेष लोकल चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. शुक्रवार, ५ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर परळ ते कल्याण आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी पनवेलदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. विशेष लोकलमधून तिकीट घेऊन प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.







