वृत्तसंस्था : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित शर्माने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या संघात समावेश असण्यापासून ते आयपीएलमध्ये वयाच्या तिशीनंतर शानदार पुनरागमन करण्यापर्यंतचा १४ वर्षांचा प्रवास त्याने संपवला.
३७ वर्षीय मोहितने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट करत सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची माहिती दिली. आयपीएल २०२६ साठी दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला रिलीज केल्यानंतर काही वेळातच त्याने हा निर्णय जाहीर केला. मोहित शर्माने २०१३ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले. त्याने देशासाठी २६ एकदिवसीय सामने (ODI) खेळले आणि त्यात ३१ बळी मिळवले, तर ८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ६ बळी घेतले. तो २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे झालेल्या विश्वचषकात भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप सोडण्यासोबतच त्याने हरियाणासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने योगदान दिले. मोहितच्या कारकिर्दीतील सर्वात प्रभावी क्षण २०२३ मध्ये आला. आयपीएलमध्ये संधी मिळवण्यासाठी झगडत असताना त्याने गुजरात टायटन्स संघात धमाकेदार पुनरागमन केले आणि त्या हंगामात २७ बळी घेऊन सर्वाधिक प्रभावी गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले.







