नवी दिल्ली : प्राणीसंग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी तिकीट खरेदी प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे. कुटुंब किंवा मित्रांसोबत येणाऱ्या अनेक पर्यटकांना ऑनलाईन तिकीट बुकिंगदरम्यान इंटरनेटचा वेग कमी असणे, वेबसाईट हँग होणे किंवा तिकीट रिजेक्ट होण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर प्राणीसंग्रहालय प्रशासनाने पर्यटकांच्या सोयीसाठी ‘सेल्फ सर्व्हिस तिकीटिंग कियोस्क’ (SSTK) प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला तिकीट काउंटर परिसरात चार कियोस्क बसवले जाणार असून, यामुळे पर्यटकांना काही सेकंदांत तिकीट मिळवणे शक्य होणार आहे. या प्रणालीद्वारे पर्यटक थेट कियोस्कवर जाऊन स्क्रीनवर आपले नाव, मोबाईल नंबर आणि आवश्यक तिकिटांची संख्या भरू शकतील. त्यानंतर UPI पेमेंट पूर्ण होताच तिकीट मोबाईलवर पाठवले जाईल तसेच कागदी तिकीटही मिळणार आहे. प्रशासनाने या यंत्रणेसाठी स्वतंत्र इंटरनेट डोमेनची सुविधा उपलब्ध करून दिल्याने इंटरनेट स्लो असणे किंवा वेबसाईटवर ताण येण्याच्या समस्यांपासून मोठा दिलासा मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या ऑनलाईन तिकीट बुकिंग न करता प्रत्यक्ष प्राणीसंग्रहालयात पोहोचणाऱ्या पर्यटकांना प्रवेशद्वाराबाहेर मोठ्या रांगा लागतात. ऑनलाईन तिकीट प्रक्रियेत फॉर्म भरताना मोबाईल नंबर, कॅप्चा कोड आणि पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. इंटरनेटचा वेग कमी असल्यास अनेकदा पुन्हा लॉगिन करावे लागते किंवा प्रक्रिया अर्धवट थांबते. कॅप्चा चुकीचा भरल्यास संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करावी लागत असल्याने पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच वेबसाईटवर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात ताण आल्याने पेमेंट झाल्यानंतरही तिकीट रिजेक्ट होण्याच्या तक्रारी वाढत होत्या. प्रशासनाच्या माहितीनुसार, दररोज २० टक्क्यांहून अधिक तिकीट रिजेक्शनची प्रकरणे समोर येत होती. आता नव्या SSTK प्रणालीमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







