वसई : वसईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निर्माल्यामुळं एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, ऑफिसला जाण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अशाप्रकारे दुर्देवी मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वसई ते भाईंदर हा रेल्वेमार्ग खाडीतून जातो. त्यामुळं अनेकजण धावत्या ट्रेनमधून खाडीत निर्माल्य फेकतात. पण या अशा घटनांमुळं अनेक जण जखमी झाले आहेत. रविवारी अशाच प्रकारे धावत्या लोकलमधून निर्माल्य फेकताना नारळ तरुणाच्या डोक्याला लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. संजय भोईर असं तरुणाचे नाव असून तो नायगाव आणि भाईंदर खाडीच्यामध्ये असलेल्या पाणजू बेटावर राहतो.
संजय हा शनिवारी सकाळी साडे आठच्या सुमारास नायगाव भाईंदर रेल्वे खाडी पुलावरुन पायी प्रवास करत नायगाव स्थानकाच्या दिशेने निघाला होता. याच दरम्यान कोणीतरी धावत्या लोकलमधून निर्माल्य फेकले. या निर्माल्यात नारळदेखील होता. हाच नारळ संजयच्या डोक्याला लागला. नारळ डोक्यात लागल्याने गंभीर जखमी झालेल्या संजयला उपचारासाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी त्याचा मृत्यू झाला. सुरुवातील संजयला वसईतील पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नंतर नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डोक्याला मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्थानिकांच्या माहितीनुसार याआधीही अशा घटनांत अनेकजण जखमी झाले आहेत.