मुंबई : मुंबईत हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र घरांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने घर घेणे हे आता सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळं अनेकजण म्हाडाच्या घरांसाठी अवलंबून असतात किंवा लॉटरीची प्रतिक्षा करत असतात. मात्र आता म्हाडा घरांच्या विक्रीबरोबरच भाडेतत्वावरदेखील घरे देण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत निविदा निघू शकते.
मुंबईसह एमएमआर क्षेत्रात नोकरी, शिक्षण, वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्यांना सहजपणे भाड्याची घरे मिळावीत, यासाठी म्हाडाने कंबर कसली आहे. राज्य सरकारच्या निर्देशनानुसार म्हाडा भाडेतत्त्वावरील घरांचे धोरण तयार करत आहे. त्याचबरोबर आता त्यांनी भाडेतत्त्वावर घर घेता यावे, यासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची कार्यवाही सुरू केली आहे. या निर्णयामुळं लवकरच म्हाडाच्या माध्यमातून भाक्याची घरे मिळू शकणार आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई घर खरेदी करणे खिशाला परवडत नाही. तसेच अनेकदा नोकरदार, विद्यार्थ्यांना घर विकत घेणे शक्य नसल्याने त्यांच्याकडून भाड्याच्या घरांना पसंती दिली जाते, मात्र अनेकदा भाड्याचे घर मिळवणे कठीण असते. तसेच केंद्र सरकारच्या नियोजनानुसार मुंबईसह एमएमआरमध्ये ग्रोथ हब उभारले जाणार आहे.







