नवी दिल्ली : देशाच्या क्रीडा क्षेत्रात मोठा बदल घडवणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. क्रीडा मंत्रालयाने राजधानीतील ऐतिहासिक जवाहरलाल नेहरू स्टेडियम पाडून त्या ठिकाणी अत्याधुनिक “स्पोर्ट्स सिटी” उभारण्याची योजना आखली आहे. हा प्रकल्प तब्बल १०२ एकर परिसरात विकसित केला जाणार आहे. सध्या हा आराखडा प्रस्तावित टप्प्यात असून, प्रकल्पाची निश्चित वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, स्टेडियममधील सर्व कार्यालये राष्ट्रीय अँटी-डोपिंग एजन्सी (NADA) आणि राष्ट्रीय डोप टेस्टिंग लॅब (NDTL) अन्यत्र स्थलांतरित केली जाणार आहेत. नव्या प्रकल्पाचे उद्दिष्ट भारतात एक “जागतिक दर्जाचे बहुउद्देशीय क्रीडा केंद्र” उभे करण्याचे आहे, जिथे प्रशिक्षण, स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करता येतील. कतार आणि ऑस्ट्रेलियातील स्पोर्ट्स सिटी प्रकल्पांचे मॉडेल्स अभ्यासात घेतले जात असून, त्या आधारे दिल्लीतील नव्या प्रकल्पाचा आराखडा अंतिम केला जाणार आहे. १९८२ साली आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी बांधलेले हे स्टेडियम, २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी पुनर्बांधणी करण्यात आले होते. सुमारे ६० हजार आसनक्षमतेचे हे स्टेडियम भारतातील प्रमुख बहुउद्देशीय क्रीडा संकुलांपैकी एक आहे. येथे फुटबॉल सामने, अॅथलेटिक्स स्पर्धा, राष्ट्रीय सोहळे आणि संगीत कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. याच स्टेडियममध्ये यावर्षीच जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप यशस्वीपणे पार पडली होती. या स्पर्धेसाठी सरकारने जवळपास ३० कोटींचा नवीन मोंडो ट्रॅक बसवला होता. आता, या स्टेडियमच्या जागी भारताच्या क्रीडा विश्वात नवा अध्याय सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.







