मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या तीन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या विद्याविहार रेल्वेस्थानकावरील पूल, शीव रेल्वेस्थानकावरील नव्या रेल्वे पुलासह गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. ‘५९ मिनिटांत मुंबई’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शहरात उत्तर-दक्षिण तसेच पूर्व-पश्चिम दिशांतील संपर्क अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात असून, या नव्या प्रकल्पांमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. वर्षा निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. विद्याविहार रेल्वेस्थानकावरील नव्या पुलामुळे पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांदरम्यानचा प्रवास सुमारे ३० मिनिटांवरून अवघ्या १० मिनिटांपर्यंत कमी होणार असून, घाटकोपर परिसरातील वाहतूक कोंडीही कमी होण्यास मदत होणार आहे. गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील सुमारे १.२६ किलोमीटर लांबीचा सहा मार्गिकांचा उड्डाणपूल गोरेगाव पूर्वेतील रत्नागिरी हॉटेल जंक्शन ते चित्रनगरीदरम्यान उभारण्यात आला असून, यामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांतील संपर्क अधिक वेगवान होणार आहे.
शीव रेल्वेस्थानकावरील ११२ वर्षे जुना पूल असुरक्षित झाल्याने त्याच्या जागी नव्या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. ५४.५ मीटर लांबी आणि २६ मीटर रुंदीच्या या पुलासाठी ४९६ टन वजनाचे दोन सेमी-थ्रू स्टील गर्डर वापरण्यात आले आहेत. रेल्वे पुलासाठी ३३.५१ कोटी रुपये, तर पोहोच रस्त्यांसाठी ३१.६२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, धारावी आणि लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दिशेने नवीन पोहोच रस्ते तसेच पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्गही विकसित करण्यात आले आहेत. हा पूल नियोजित वेळेपेक्षा सुमारे चार महिने आधी पूर्ण करण्यात आला असून, मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान प्रस्तावित पाचव्या आणि सहाव्या रेल्वेमार्गिकांसाठीही तो महत्त्वाचा ठरणार आहे. या मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर लोकल गाड्यांची संख्या आणि वारंवारता वाढविणे शक्य होणार आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिका काँक्रीट रस्ते, कोस्टल रोड आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून शहरातील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी काम करत असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले. राज्य शासन, केंद्र शासन आणि महानगरपालिका यांच्या समन्वयातून मोठे प्रकल्प वेगाने पूर्ण होत असून, त्याचा थेट फायदा मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाला होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

