ठाणे : दसरा आणि दिवाळीमध्ये नागरिक मोठ्याप्रमाणात खरेदी करतात. याचा गैरफादा घेऊन बनावट चलन बाजारात विविध माध्यमातून आणले जाते. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने बनावट चलन बदली करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. शिवानंद कोळी (२४) आणि राहुल शेजवळ (२४) अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून ५०० रुपये दराचे बनावट चलन, एक पिस्तुल, काडतुस, मोटार असा ६ लाख ३३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सण उत्सवांमध्ये बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिक जातात. साहित्य खरेदीसाठी रोख व्यवहार होतात. गर्दीचा गैरफायदा घेऊन अनेकदा बनावट चलन देखील बाजारात आणले जाते. भिवंडी येथील मिल्लतनगर परिसरात बनावट चलन बदलीसाठी दोघे येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या भिवंडी गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा रचून चाविंद्रा येथे एका मोटारीतून शिवानंद कोळी आणि राहुल शेजवळ हे जात होते. पोलिसांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, दोघेही नाशिक येथील रहिवासी असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्यांच्या मोटारीमध्ये तपासणी केली असता, बनावट ५०० रुपये दराचे बनावट चलनाचे ४८ बंडल, पिस्तुल, एक काडतुस आढळून आले. त्यांच्याविरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी चलन बदली करण्याच्या अमीषाला बळी पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.