मुंबई : ‘आरोग्याशी तडजोड नाही, आरोग्याशी घातक पदार्थांना थारा नाही’ या संकल्पनेतून अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयाने राज्यभर भेसळखोर आणि अस्वच्छ अन्न उत्पादकांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या कारवाईत मसाले, गुटखा, दूध व दुग्धजन्य पदार्थ, आंबे, आईस्क्रीम तसेच इतर खाद्यपदार्थांची विक्री करणारी ८६ दुकाने सील करण्यात आली असून १०२ जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत तब्बल १ कोटी ५८ लाख रुपये आहे. गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये प्रथमच २७२ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. राज्यातील १३० दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०३ दुकानांमध्ये सुमारे ३४ लाख रुपयांचे प्रतिबंधित पदार्थ आढळून आले. संबंधितांवर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार ७२ गुन्हे दाखल करण्यात आले असून नऊ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
याशिवाय कमी दर्जाचे व असुरक्षित अन्नपदार्थ, अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया आणि दिशाभूल करणारे पॅकेजिंग याविरोधातही विभागाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत ७३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. बुंदी लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, गूळ, खाद्यतेल, तूप, आईस्क्रीम आणि मसाल्यांसह सुमारे ९० हजार किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत १ कोटी २४ लाख रुपये आहे. मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात झालेल्या कारवायांची मंत्रालयातही चर्चा रंगली आहे. या मोहिमेत विविध नामांकित कंपन्यांच्या उत्पादनांचीही तपासणी करण्यात आली असून कोणालाही सूट देण्यात आलेली नाही. दरम्यान, नागरिकांनी संशयास्पद अन्नपदार्थ किंवा भेसळीची माहिती मिळाल्यास १८००२२२३६५ या नि:शुल्क क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शुद्ध अन्न मिळणे हा नागरिकांचा अधिकार असून जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
- कोकण विभाग : ४७ कारवाया, ४६ व्यक्तींना अटक
- बृहन्मुंबई : २२ कारवाया, २३ व्यक्तींना अटक
- पुणे विभाग : १४ कारवाया, १३ व्यक्तींना अटक
- नाशिक विभाग : ५ कारवाया, ५ व्यक्तींना अटक
- छत्रपती संभाजीनगर विभाग : ८ कारवाया, ८ व्यक्तींना अटक
- अमरावती विभाग : ५ कारवाया, ५ व्यक्तींना अटक
- नागपूर विभाग : २ कारवाया, २ व्यक्तींना अटक







