मुंबई : घरगुती आणि सात दिवसांच्या गणरायांच्या विसर्जनानंतर एकिकडे कोकणवासीयांनी पुन्हा शहराची वाट धरलेली असतानाच आता शहरातील अनेक भाविकसुद्धा घरच्या बाप्पाच्या पाहुणचारानंतर सार्वजनिक मंडळांमधील गणेशमूर्ती पाहण्यासाठी घराबाहेर पडताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये रस्त्य्यांवर होणारी वाहतूक कोंडी पाहता रेल्वे प्रवासालाच अनेकांचं प्राधान्य दिसून येत आहे. यामध्ये फक्त मुंबईतीलच नव्हे, तर मुंबईबाहेरील प्रवाशांचाही समावेश आहे. अशा स्थितीमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता रेल्वे विभागानं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची संभाव्य गर्दी पाहता, यादरम्यान भाविकांच्या वाटेत असणारं वाहतूक कोंडी आणि तत्सम विघ्न दूर करण्यासाठी रेल्वे विभाग धावून आला आहे. थोडक्यात गणेशोत्सवादरम्यान भाविकांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी/ CSMT) आणि ठाणे / कल्याण या स्थानकांदरम्यान रात्रीच्या वेळेत २२ जादा लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून शनिवारी मध्यरात्रीपर्यंत (CSMT- Thane/ Kalyan) सीएसएमटी – ठाणे/कल्याणदरम्यान मुख्य मार्गावर या जादा लोकल धावतील. फक्त मध्य रेल्वे नव्हे, तर पश्चिम रेल्वेवरही दरम्यानच्या काळात १२ जादा लोकल सोडण्यात येतील.
मध्य रेल्वेनेच्या माहितीनुसार, सीएसएमटी-कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री १.४० वाजता सुटेल आणि कल्याणला रात्री ३ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. सीएसएमटी – ठाणे जादा लोकल सीएसएमटीहून रात्री २.३० वाजता सुटेल आणि ३.३० वाजता ठाण्याला पोहोचेल. तर, सीएसएमटी – कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून मध्यरात्र उलटून ३.२५ वाजता सुटून कल्याणमध्ये पहाटे ४.५५ ला पोहोचेल. कल्याण – सीएसएमटी विशेष लोकल कल्याणहून रात्री १२.५ ला निघून रात्री १.३० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ठाणे – सीएसएमटी जादा गाडी ठाण्याहून रात्री १ वाजता निघून आणि रात्री २ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. तर दुसरी ठाणे-सीएसएमटी विशेष लोकल ठाण्याहून रात्री २ सुटून रात्री ३ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. भाविकांचा प्रवास आणि गर्दी नियंत्रित करण्यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री पश्चिम रेल्वेवरून १२ विशेष लोकल चालवण्यात येतील. शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटेपर्यंत चर्चगेट – विरार आणि विरार – चर्चगेटदरम्यान धीम्या मार्गावर या लोकल उपलब्ध असतील.







