मुंबई : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे. वांद्रे पूर्वच्या स्कायवॉकचं २०१९ पासून सुरू असलेलं बांधकाम आता पूर्ण झालं असून, बीएमसीने उभारलेला हा स्कायवॉक संपूर्ण वांद्रे स्टेशन रोडला ओलांडून, महामार्गाला जोडतो आणि थेट कलानगर जंक्शन येथे उतरतो. या स्कायवॉकमुळे वांद्रे कोर्ट, वांद्रे-कुर्ला संकुल (BKC), म्हाडा तसेच जिल्हाधिकारी कार्यलयापर्यंत ये-जा करणं सोपं होणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण करण्याची अंतिम मुदत डिसेंबर २०२५ होती. पंरतू, काही अंतिम टप्प्यातील कामं बाकी असल्यामुळे हे काम पूर्ण नव्हतं झालं. त्यातच कोर्टाने हा पूल लवकरात-लवकर खुला करण्याचा आदेश दिल्यामुळे हे काम पूर्ण करणं अनिवार्य होतं. परंतू, आता हे काम झालं असून, २६ जानेवारीला, प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर वांद्रे पूर्व येथील स्कायवॉक प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. या पूर्वी बांधलेल्या पूलावरून रेल्वे पुलावर जाण्याची सुविधाही होती, मात्र कालांतराने त्या ठिकाणी फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले. आता या नव्या पूलावर फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणं मापालिकेसाठी गरजेचं आहे. वांद्रे न्यायालय ते रेल्वे स्थानकादरम्यानचा परिसर अत्यंत वर्दळीचा आहे. खराब रस्ते आणि विस्कळीत पादचारी वाहतूक यामुळे रोजचा प्रवास त्रासदायक असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून सातत्याने होत आहेत. सहा मीटर रुंद असलेल्या या नव्या स्कायवॉकवर दोन ठिकाणी सरकते जिने आहेत. शिवाय तीन ठिकाणी अतिरिक्त जिने असून यामुळे प्रवाशांची ये-जा सुलभ होऊन गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. वांद्रे पूर्वेकडील हा नवा बीएमसी स्कायवॉक संपूर्ण स्टेशन रोड ओलांडून महामार्गावरून जात थेट कलानगर जंक्शनला जोडला जातो. त्यामुळे प्रवाशांना खालील वाहतूक कोंडीत अडकलेल्या रस्त्यावर उतरण्याची गरज न पडता महामार्गाच्या पलीकडील कार्यालयांपर्यंत सहज पोहोचता येणार आहे.






