मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील लाखो तरुणांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सरावासाठी राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मालकीची तसेच त्यांच्या व्यवस्थापनाखालील मैदाने आणि क्रीडांगणे विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत. ‘मिशन खाकी’ या उपक्रमांतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, उमेदवारांना सरावासाठी योग्य सुविधा मिळाव्यात हा त्यामागील उद्देश आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राज्यभरातील युवकांशी संवाद साधताना सरावासाठी मैदानांची कमतरता ही मोठी अडचण असल्याचे निदर्शनास आणले होते. त्यानंतर त्यांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मैदाने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत नगरविकास विभागाने आवश्यक अधिसूचना जारी केली. त्यानुसार पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित संवर्गाची मैदानी चाचणी पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना सरावासाठी मैदाने वापरण्याची परवानगी देण्यात येणार आहे. सरावासाठी पहाटे ५ ते सकाळी ९ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.
नगरविकास विभागाने केवळ मैदाने उपलब्ध करून देण्याचेच नव्हे, तर उमेदवारांना आवश्यक मूलभूत सुविधा देण्याचे निर्देशही स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यानुसार सरावासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि वापरण्यायोग्य मैदान तसेच धावपट्टी उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. याशिवाय सरावासाठी येणाऱ्या उमेदवारांना शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींवर सोपविण्यात आली आहे. सरावादरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत मिळावी यासाठी प्राथमिक उपचारांची व्यवस्था करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. या सुविधांसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, शिवछत्रपती क्रीडा संकुल, जिल्हा पोलीस प्रशिक्षण केंद्रे तसेच मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांचे सहकार्य घेण्यास सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दर्जेदार सराव सुविधा मिळण्यास मदत होणार असून, आर्थिक अडचणी आणि मैदानांच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांवरही मोठ्या प्रमाणात मात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

