नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची सुविधा सुरू करण्यात येत आहे. आता टोल प्लाझा ओलांडताना FASTag द्वारे केवळ टोल वसूल केला जाणार नाही, तर वाहनाच्या विम्याची वैधताही तपासली जाणार आहे. वाहनाचा विमा कालबाह्य झाल्यास संबंधित वाहनधारकाला तात्काळ मोबाईलवर एसएमएसद्वारे सूचना पाठवली जाईल. हा दंड नसून विमा नूतनीकरणाची आठवण करून देणारा अलर्ट असेल, ज्यामुळे वाहनधारकांना वेळेत विमा नूतनीकरण करता येईल. मात्र, मोटार वाहन कायद्यानुसार वैध विम्याशिवाय वाहन चालवणे नियमांचे उल्लंघन मानले जाते आणि अशा प्रकरणात ५,००० ते १०,००० रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. सध्या दिल्लीतील मुंडका टोल प्लाझावर ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून, यशस्वी चाचणीनंतर ती देशभरातील टोल प्लाझांवर टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे.
ही संपूर्ण व्यवस्था स्वयंचलित डेटा शेअरिंग प्रणालीवर आधारित आहे. टोल प्लाझावरील यंत्रणा राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या (NIC) वाहन डेटाबेसशी जोडण्यात आली आहे. वाहन टोल प्लाझावरून जाताच कॅमेरे आणि अन्य डिजिटल प्रणाली वाहनाचा नोंदणी क्रमांक ओळखतील. त्यानंतर संबंधित वाहनाच्या विम्याची माहिती डेटाबेसमधून तपासली जाईल. विमा वैध असल्यास कोणतीही अतिरिक्त प्रक्रिया होणार नाही. मात्र, विम्याची मुदत संपलेली असल्यास वाहनमालकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर त्वरित एसएमएस पाठवून विमा नूतनीकरणाची सूचना दिली जाईल. या उपक्रमामुळे विम्याशिवाय वाहन चालविण्याचे प्रमाण कमी होण्यास, नियमांचे पालन वाढण्यास आणि अपघाताच्या वेळी वाहनधारकांना आर्थिक संरक्षण मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

